पिंपरी मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात; ३९८ मतदान केंद्रांची तयारी
पिंपरी : पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया आज यशस्वीरीत्या पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मतदारसंघात १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ३९८ मतदान केंद्रांसाठी आवश्यक साहित्य सज्ज करण्यात आले आहे.
डॉ. हेडगेवार भवन, निगडी प्राधिकरण येथे झालेल्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निरीक्षक मनवेशसिंग सिध्दू यांनी उपस्थित उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शक सूचना दिल्या.
मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ४७७ बॅलेट युनिट, ४७७ कंट्रोल युनिट आणि ५१७ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३९८ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी एक बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट व एक व्हीव्हीपॅट यंत्र वाटप करण्यात आले असून, ७९ बॅलेट युनिट, ७९ कंट्रोल युनिट आणि ११९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.
पुढील कार्यक्रमानुसार १० व ११ नोव्हेंबर रोजी मतदान यंत्रांची जुळवणी व सिम्बॉल लोडिंग होणार असून, १३ व १४ नोव्हेंबर दरम्यान ईव्हीएम मतदानासाठी तयार करण्यात येणार आहेत.
या प्रक्रियेदरम्यान समन्वय अधिकारी मुकुंद पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, नोडल अधिकारी प्रशांत शिंपी, संतोष कुदळे, सत्वशील शितोळे, विजय बोरुडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०१:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: