भोसरीत योगी आदित्यनाथांची दमदार सभा
पिंपरी-चिंचवड : "भारताचा पाया सनातन आहे, आणि सनातवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे," अशा शब्दांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महायुतीच्या विराट सभेत महाविकास आघाडीवर तीव्र टीका केली. त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-एनसीपी-आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ भोसरी येथील गावजत्रा मैदानावर रविवारी विराट सभा पार पडली.
सभेची सुरूवात
सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये खासदार श्रीरंग बारणे, गुजरातचे माजी मंत्री प्रदीप जडेजा, आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल, माजी महापौर नितीन काळजे, हभप दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रवादीच्या कविता आल्हाट यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि हजारो समर्थक उपस्थित होते.
नवा भारत, नवी दिशा
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात, "भारताचा नवा चेहरा आणि नवा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत देत आहे. ‘हम छेडेंग नहीं लेकीन हमें छेडेंगे तो छोडेगे नहीं’ असा संदेश जगभरात गेला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाने मोठी प्रगती केली असून, राष्ट्रीय सुरक्षेपासून ते विकासापर्यंत सर्व मुद्द्यांवर भाजपाने कणखर भूमिका घेतली आहे," असे ते म्हणाले.
काँग्रेसवर कडवट टीका
योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर तीव्र टीका करताना असे म्हटले की, "काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले. 1947 मध्ये अखंड भारताचे विभाजन होऊ नये असे काँग्रेसला वाटले असते, तर लाखो निर्दोष हिंदूंचा बळी गेला नसता. काँग्रेसच्या सत्तालोलूपतेमुळे हिंदू-मुस्लिम समस्येचा उगम झाला. आज भाजपाच्या नेतृत्वाखाली देशाने विभाजनाच्या या जखमांवर मलमपट्टी करायला सुरुवात केली आहे."
महाराष्ट्राबद्दल विशेष कृतज्ञता
"महाराष्ट्राने देशाला अनेक थोर नेते दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना महाराष्ट्रात केली. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महामानवांनी देशाच्या विकासात अमूल्य योगदान दिले आहे," असे सांगून योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील भूमीच्या महानतेची प्रशंसा केली.
समान संधी, समान हक्क
योगी आदित्यनाथ यांनी "सबका साथ, सबका विकास" या मंत्राचे महत्व अधोरेखित केले. "कोणत्याही तुष्टीकरणाशिवाय, सर्वांना समान संधी देत देश प्रगती करत आहे. भाजपाचे धोरण ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या विचारावर आधारित आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२४ ०८:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: