पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज पर्वती आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांनी सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधत आपला विश्वास व्यक्त केला आणि विक्रमी मताधिक्याने विजय मिळविण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
आमदार माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया
पर्वती विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी आज सकाळीसाडेअकरा वाजता बिबवेवाडी येथील सिताराम आबाजी बिबवे शाळेमध्ये कुटुंबीयांसह मतदान केले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, "गेली पंधरा वर्षे आमदार म्हणून पर्वती विधानसभा मतदारसंघाचा गतिमान, शाश्वत, आणि नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मतदारांचा विश्वास आणि प्रेम मिळवता आले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रभावी प्रचार केला, त्याचे सकारात्मक प्रत्यंतर आज मतदानाच्या स्वरूपात दिसले. मतदारांनी जो विश्वास टाकला आहे, त्याचा मी आदर करेन आणि पर्वतीचा विकास अधिक वेगाने साध्य करेन."
हेमंत रासने यांची प्रतिक्रिया
कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी आज सकाळी साडेसात वाजता नूमवि शाळेत मतदान केले.
मतदानानंतर त्यांनी सांगितले, "स्थायी समिती अध्यक्ष म्हणून पुणे शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करून नागरी समस्यांवर प्रभावीपणे उपाययोजना केल्या. गेल्या दीड वर्षांत सेवा आणि संघर्षाच्या माध्यमातून कसब्यातील नागरिकांचे प्रेम आणि विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालो. सात हजारहून अधिक नागरी समस्या सोडवल्या आणि वीस हजारांहून अधिक नागरिकांना मदत केली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एकजुटीने प्रचार केला, त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवीन याची मला खात्री आहे."
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पर्वती आणि कसबा मतदारसंघांमध्ये मतदारांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांनी जनतेच्या विश्वासावर उभे राहून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे वचन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: