भोसरी : "पुराणातील बकासुराचा अंत झाला असला तरी बकासुर प्रवृत्तीचा अजून अंत झालेला नाही. त्या बकासुराला गाडाभर अन्न लागत होते, पण 'या' बकासुराला भंगार, कचरा, कंत्राटे, सातबारा, संतपीठ अगदी इंद्रायणी सुधार प्रकल्पसुद्धा कमी पडत आहे," अशी घणाघाती टीका शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभेतील उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ निगडी-यमुनानगर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
कोल्हे म्हणाले, "अजित गव्हाणे यांना सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. 40 आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे पाठबळ त्यांच्यामागे आहे. प्रत्येकाने किमान पाच हजार मतांची जबाबदारी घेतली तर विजय निश्चित आहे."
"पिंपरी-चिंचवड पालिकेत 'आपण आमदार होऊ आणि पालिकेचा मलिदा खाऊ' ही योजना अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे थांबवण्यासाठी एकजुटीने काम करायचे आहे," असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: