पाणी मीटर निरीक्षक व कॉम्प्युटर ऑपरेटर लाचखोरीच्या जाळ्यात
पुणे (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 'ह' प्रभागात पाणीपट्टी बिल नियमित करण्यासाठी १,६०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाणी मीटर निरीक्षक आणि कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर यांना रंगेहाथ पकडले.
विकास सोमा गव्हाणे (पाणी मीटर निरीक्षक) आणि आशा कानिफनाथ चौपाली (कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराचे पाणीपट्टी बिल नियमित करण्यासाठी गव्हाणे याने स्वतःसाठी १,००० रुपये आणि चौपाली हिच्यासाठी ६०० रुपये अशी एकूण १,६०० रुपयांची लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 'ह' प्रभाग कार्यालयात सापळा रचला. चौपाली हिला तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. त्यानंतर गव्हाणे याने फोनवरून त्याच्या हिश्श्याची रक्कम चौपाली हिच्याकडेच ठेवण्यास सांगितल्याचे उघड झाले.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले पुढील तपास करीत आहेत.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०१:१८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: