कासारवाडीत बनसोडे यांच्या प्रचार फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय
पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभागनिहाय जनसंपर्क कार्यालये उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.
शुक्रवारी कासारवाडी भागात आयोजित भव्य प्रचार फेरीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. सूर्यमुखी महादेव मंदिराच्या दर्शनाने सुरू झालेल्या या फेरीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक श्याम लांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शास्त्रीनगर, जवळकर कॉलनी, गुलिस्तान नगर, हिराबाई झोपडपट्टी, जय महाराष्ट्र चौक, ज्ञानेश्वर कॉलनी, पिंपळे सदन मार्गे गोयल रेसिडेन्सीपर्यंत ही प्रचार फेरी निघाली.
प्रचार फेरीदरम्यान ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि नवमतदारांशी संवाद साधला. विशेष म्हणजे तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा बनसोडे यांना असल्याचे या रॅलीत दिसून आले.
प्रचार फेरीत आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, कष्टकरी कामगार नेते बाबा कांबळे यांच्यासह महायुती घटक पक्षांचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०३:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: