उलवे येथे पत्रकार बांधवांसाठी विशेष दिवाळी फराळ कार्यक्रम
उलवे (नवी मुंबई) (प्रतिनिधी) - समाजातील घडामोडींचे प्रतिबिंब जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकार बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी जे. एम. म्हात्रे कुटुंबियांनी शनिवारी विशेष फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले.
कोपर गावातील सेक्टर ८ मधील रंजना बंगला येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रसिद्ध उद्योजक जे. एम. म्हात्रे आणि नारायणशेठ यांनीही पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील आणि मंदार दोंदे यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना म्हात्रे कुटुंबाचे आभार मानले.
म्हात्रे कुटुंबियांकडून पत्रकारांच्या सुख-दुःखात नेहमीच सहभागी होण्याची भूमिका घेतली जात असल्याने या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी म्हात्रे कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देत फराळाचा आस्वाद घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: