भाजपा कार्यकर्त्यांनी घ्यावी तीन घरांची जबाबदारी – चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
काटोल (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका फक्त एका उमेदवाराच्या भाग्याची नाहीत तर राज्याच्या विकासाची दिशा ठरविणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या आजूबाजूच्या तीन घरांची जबाबदारी घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास भाजपावर असून, महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात भाजपा-महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारासाठी बावनकुळे यांनी काटोल आणि मोवाड येथे सभा घेतल्या. सावनेर विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या प्रचारार्थ कळमेश्वरमध्ये आणि हिंगणा मतदारसंघातील समीर मेघे यांच्या प्रचारासाठी रायपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जनसभांचे आयोजन केले. बावनकुळे यांनी सतरंजी संघटनेने चरणसिंग ठाकूर यांना दिलेला पाठिंबा जाहीर केला.
कळमेश्वर येथे काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, बँक घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली असून, पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी दिली नसून, त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. हिंगणा मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समीर मेघे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रचार सभांमध्ये नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मध्यप्रदेशच्या खासदार मायाताई मरोलिया, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार अशोक मानकर, राजेश जीवतोडे, प्रकाश टेकाडे, अविनाश ठाकरे, किरण पांडव, आणि इतर अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर उपनगरांचा सुनियोजित विकास
भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून भूमिका निभावत सायंकाळी ७ वाजता श्री बावनकुळे यांनी कामठी विधानसभा क्षेत्रात धुव्वाधार प्रचार केला. नागपूरच्या उपनगरांचा सुनियोजित विकास करण्यासाठी भाजपाचे सरकार आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी मतदारांना सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ १०:४२:०० AM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: