४० वर्षे उलटूनही पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप
प्रशासनाच्या फक्त बैठका; प्रत्यक्ष कृती शून्य
विठ्ठल ममताबादे
उरण : जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित केलेल्या शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) गावाचे ४० वर्षांत पुनर्वसन झालेले नाही. ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने गावात संतापाची लाट पसरली आहे. यामुळे ग्रामस्थांनी आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
शुक्रवार, ३ मार्च २०२३ रोजी शेवा कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता, त्यानुसार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. आता २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या उरण विधानसभा निवडणुकीत देखील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला आहे.
ग्रामस्थांचा संताप आणि प्रशासनाची अनागोंदी
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर, उरण तालुक्यातील अनेक गावे विविध सेवा सुविधांपासून वंचित आहेत. शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाशी शांततेच्या मार्गाने पत्रव्यवहार केला, संप आणि आंदोलने केली, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामस्थांच्या विविध मागण्यांची दखल घेतली गेलेली नाही, हे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पुनर्वसनासाठी फसवणूक आणि शासनाची अडचण
१२ नोव्हेंबर १९८२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांकडून शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाने ठराव केला होता, पण याबाबत कार्यवाही केली गेली नाही. जेएनपीटीने कमी फंड दिल्यामुळे जिल्हाधिकारी रायगड यांनी शेवा कोळीवाडा गावातील विस्थापितांना बोरीपाखाडी येथील संक्रमण शिबिरात ठेवले आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रशासनाने पुनर्वसन आणि रोजगाराच्या बाबतीत फसवणूक केली आहे.
राजकीय नेत्यांची उदासीनता
ग्रामस्थांनी आरोप केला आहे की कोणत्याही राजकीय नेत्याने अथवा लोकप्रतिनिधींनी शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे प्रयत्न केलेले नाहीत. याविषयी ग्रामस्थांच्या मनामध्ये चीड आहे. शासनाच्या वारंवार दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी आगामी सर्व निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला आहे.
ग्रामस्थांचा इशारा
ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडाचे अध्यक्ष सुरेश दामोदर कोळी आणि उपाध्यक्ष मंगेश अनंत कोळी यांनी सांगितले की, गेल्या ४० वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न असलेला हनुमान कोळीवाडा गावात आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ देणार नाही. अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास संबंधित नेत्यांना जबाबदार ठरवले जाईल.
"कोणत्याही राजकीय नेत्याने, लोकप्रतिनिधीने पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र अथवा राज्य शासनाकडे प्रयत्न केलेले नाहीत. याविषयी ग्रामस्थांच्या मनामध्ये चीड आहे. प्रशासन नेहमी दुर्लक्ष करत आहे. गेली ३६ वर्षांपासून शासन आम्हाला फसवत आहे त्याचा निषेध म्हणून आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
– सुरेश कोळी, अध्यक्ष, ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०३:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: