आयटी क्षेत्राच्या समस्यांवर महाविकास आघाडीचे लक्ष
चिंचवड,(प्रतिनिधी) - शरदचंद्र पवार यांनी आणलेल्या जागतिक दर्जाच्या आयटी हबची सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे दुरवस्था झाल्याची टीका महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केली. काळेवाडी येथील इंदू लॉन्समध्ये आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सेक्रेटरी पृथ्वीराज साठे मित्र परिवारतर्फे आयोजित या कार्यक्रमात कलाटे यांनी आयटी क्षेत्रातील समस्यांवर भाष्य केले. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, रहाटणी, वाकड, थेरगाव परिसरातील आयटी वसाहतींना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
"शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे हिंजवडी आयटी पार्क उभे राहिले. त्यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळाला. मात्र सध्याच्या सरकारच्या उदासीन धोरणामुळे अनेक आयटी कंपन्या हिंजवडीतून पलायन करत आहेत," असे कलाटे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मोरे, अभिमन्यू दहीतुले, बाबू नायर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रेय देशमुख यांनी आयटी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले.
Reviewed by ANN news network
on
११/०३/२०२४ ०७:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: