उरण : "उरणची जागा आम्ही लढवणार आणि निश्चितपणे जिंकणार," असा ठाम विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी व्यक्त केला. स्थानिकांचे हित जपण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही लढाई असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हीच शेकापची खरी ताकद असल्याचे सांगताना म्हात्रे म्हणाले, "कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळेच पक्षाची वाटचाल होत असते. आम्ही नेहमीच त्यांच्या इच्छेनुसार काम करतो." स्थानिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना चांगलेच धडे शिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
"शेकापला चळवळीचा वारसा लाभला आहे. संघर्षातूनच यश मिळवण्याची पक्षाची परंपरा आहे," असे सांगत म्हात्रे यांनी एकनिष्ठेचा लाल बावटा घेऊन कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक जिंकणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या निवेदनातून म्हात्रे यांनी राजकीय वर्तुळात चाललेल्या चर्चांना पूर्णविराम दिला असून, उरण मतदारसंघात शेकापच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: