उरण (वार्ताहर): उरण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे कृष्णा पांडुरंग वाघमारे यांनी शोषित, वंचित आणि आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
'सिंह' या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणारे वाघमारे यांनी आदिवासी गावठाण, दलित प्लॉट, वन हक्क आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
"उरण मतदारसंघातील आदिवासी आणि वंचित घटकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच मी निवडणूक लढवत आहे," असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या जाहीर केलेल्या कार्यक्रमात प्रदूषण नियंत्रण, स्थानिकांना रोजगार, शैक्षणिक सुविधा, हुतात्मा स्मारक विकास आणि आरक्षण संरक्षणाचा समावेश आहे.
इंडियन सोशल मूव्हमेंटचे महाराष्ट्र अध्यक्ष अॅड. प्रकाश विजय कदम यांनी वाघमारे यांना जाहीर पाठिंबा देताना त्यांच्या समाजोपयोगी कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. "आदिवासी समाजातून आलेले हे उत्तम व आदर्श नेतृत्व विधानसभेत पाठवून बहुजन समाजाचा आवाज बुलंद करावा," असे आवाहन त्यांनी केले.
उरण विधानसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात असून, वाघमारे यांनी मतदारांना 'सिंह' चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: