उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ऐतिहासिक आढावा बैठक संपन्न
उरण (वार्ताहर): उरण विधानसभा मतदारसंघाच्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) ने महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
कोटनाका येथील आनंदी हॉटेलमध्ये आयोजित आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
"सध्याचे आमदार महेश बालदी यांनी कोणतेही विकासकार्य न करता उलट स्थानिक भूमिपुत्रांचा सातत्याने अपमान केला आहे. आगरी-कोळी-कराडी समाज त्यांना कधीही माफ करणार नाही," असे तीव्र शब्दांत भावना घाणेकर यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहरशेठ भोईर यांनी आपल्या भाषणात सध्याच्या आमदारांवर जोरदार टीका करत, "परप्रांतीय आमदारामुळे उरणचा बट्टयाबोळ झाला आहे. महेश बालदी नावाचे पार्सल या निवडणुकीत राजस्थानला पाठवा," असे आवाहन केले.
कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संतोष ठाकूर, रायगड जिल्हाध्यक्ष दिपीका भांडारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवीन कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश देऊन नियुक्तीपत्रे देण्यात आली.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. एकंदरीत आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: