दिघी पोलिसांची कामगिरी
पुणे: पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आळंदी-मोशी मार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केली आहे. दिघीतील आदर्शनगर परिसरात शिव कॉलनी येथे ही कारवाई करण्यात आली असून, यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अर्जुनसिंग सुरजितसिंग भादा (२२), सोहेल अलिशेर मिर्झा (२२), रोमन दस्तगीर मुल्ला (२०) आणि आकाश सुधीर साळवी (२२) यांचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान बादशाहसिंग पोलादसिंग भोंड, चेतन उर्फ चेप्या पांचाळ हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
विशेष म्हणजे आरोपींकडून दोन कोयते, पालघन, लायटर पिस्टल, नायलॉन दोरी, मिरची पावडर, सहा मोबाईल, दोन मोटारसायकल आणि स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी सोहेल मिर्झा व रोमन मुल्ला हे तडीपार असून, अर्जुनसिंग भादा दोन गुन्ह्यांत वॉन्टेड होता. तसेच आकाश साळवी एका गुन्ह्यात वॉन्टेड होता. या सर्वांविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी, दहशत माजवणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०५:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: