पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून 'डिजिटल लक्ष्मी दर्शन' सुरू असल्याचा गंभीर आरोप शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ यमुनानगर, निगडी येथे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
"लोकसभेत रात्री-रात्री बँक शाखा उघड्या ठेवून काय झाले ते आपण पाहिले. आता भोसरीत भाजपच्या 'डिजिटल इंडिया'चा वेगळाच प्रचार सुरू आहे," असे म्हणत कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना सतर्कतेचे आवाहन केले.
शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी शिवसैनिकांच्या त्यागाचा गौरव केला. "उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर केल्याची वेदना शिवसैनिकांमध्ये आजही कायम आहे. मात्र, आघाडी मजबूत राहावी म्हणून कमी जागा स्वीकारल्या," असे अहिर म्हणाले.
कार्यक्रमास शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेविका भिमाबाई फुगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
अहिर यांनी शिवसैनिकांच्या त्यागाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की पदे, महामंडळे किंवा विधानसभा-विधानपरिषदेच्या जागांची अपेक्षा न ठेवता शिवसैनिक पक्षासाठी काम करत आहेत. सुलभा उबाळे, रवी लांडगे यांच्यासह सर्व शिवसैनिकांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: