पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गहुंजे येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कठोर भूमिका घेत बांधकामधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारंवार नोटीस देऊनही बांधकाम न थांबवल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मावळ तालुक्यातील गहुंजे येथील सर्वे नंबर १३८ मधील जागेवर मीना विजय आहेर यांनी सुरू केलेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्राधिकरणाने यापूर्वी संबंधित बांधकामधारकाला अनेकदा नोटिसा बजावून बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र या नोटिसांकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवल्याने अखेर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी लागली.
ही कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार आशा होळकर, रविंद्र रांजणे आणि कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे यांचा सक्रिय सहभाग होता.
प्राधिकरणाचे आवाहन:
पीएमआरडीएने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकांना बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू असल्यास ते तात्काळ थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भविष्यातील धोरण:
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामधारकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने दिला आहे. प्राधिकरणाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: