थेरगाव येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी; केंद्रात इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी

थेरगाव : चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे पार पडणार आहे. या मतमोजणीसाठी एकूण २९ टेबल लावण्यात येणार आहेत. उमेदवारांनी प्रत्येक टेबलसाठी मतमोजणी प्रतिनिधीची नेमणूक करावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे. या नेमणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने नियुक्त प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसेच, वैध ओळखपत्राशिवाय कोणासही मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.

२३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांच्या विशेष उपस्थितीत उमेदवार आणि प्रतिनिधींसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली. थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे पार पडलेल्या या बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे तसेच विविध कक्षांचे समन्वय अधिकारी आणि उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.

मतमोजणीचे नियोजन

मतमोजणी प्रक्रियेसाठी २९ टेबलांचा वापर करण्यात येणार आहे, ज्यामध्ये २४ फेऱ्या पार पडतील. ईव्हीएमसाठी २४ टेबल, टपाली मतांसाठी ४ टेबल, आणि ईटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) १ टेबल लावण्यात येईल. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक फेरीनंतर मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे आकडेवारी वेळोवेळी जाहीर केली जाईल.

मतमोजणी केंद्रातील नियमावली

मतमोजणी केंद्रात उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल फोन, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे. उमेदवार प्रतिनिधींनी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, मतमोजणी प्रतिनिधींनी मतमोजणी प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत वैध ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी स्पष्ट केले.

मतदानाची माहिती

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदानाची टक्केवारी ५८.३९ आहे. एकूण ३ लाख ८७ हजार ५२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, ज्यामध्ये २ लाख ३ हजार ७८१ पुरूष, १ लाख ८३ हजार ७२४ महिला, आणि १५ इतर मतदारांचा समावेश आहे.

यावेळी उमेदवार प्रतिनिधींना मॉक पोल आणि मतदान प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे बदलण्यात आलेल्या मतदान यंत्रांची माहिती देखील पुरवण्यात आली.

थेरगाव येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी; केंद्रात इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी थेरगाव येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी; केंद्रात इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी Reviewed by ANN news network on ११/२१/२०२४ १०:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".