हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 'शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा'च्या (सिडको) जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारलेला दर्गा आणि इतर अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जमीनदोस्त केली आहेत. हिंदु जनजागृती समितीने सतत केलेल्या प्रयत्नांमुळे आणि ईश्वराच्या कृपेने हे यश मिळाले आहे. शासनाने या मुद्द्याला गांभीर्याने घेत कारवाई केल्याबद्दल समितीने शासनाचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी
विशाळगड, कुलाबा, लोहगड, वंदनगड, शिवडी या किल्ल्यांवरही अतिक्रमण झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित या गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे हटवणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीने या मागणीला सातत्याने पुढे नेले आहे. त्यामुळे माहीम किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. राज्य पुरातत्त्व विभागाच्या म्हणण्यानुसार, सध्या राज्यातील ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. प्रतापगड, माहीम किल्ला आणि नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांसारखेच इतर गडदुर्गांवरील अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.
सुरक्षा धोक्यात आणणारे अनधिकृत बांधकाम
सिडकोच्या जमिनीवर उभारण्यात आलेले अनधिकृत दर्गा आणि अन्य बांधकामे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेला आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करीत होती. वर्ष २०१२ मध्ये चार दगडांना पांढरे आणि हिरवे रंग दिले होते आणि आता २०२४ पर्यंत त्या दगडांच्या आजूबाजूला एक एकरची मालमत्ता बळकावली होती. त्या ठिकाणी झाडाखाली चार पांढऱ्या रंगाच्या दगडांनी कंपाऊंड, कारंजे, घुमट, पाण्याच्या टाक्या, आऊटहाऊस, गेस्ट हाऊस, आणि पार्किंग यांसारखे मोठे बांधकाम करण्यात आले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर होते.
मार्च २०२३ मध्ये हिंदु जनजागृती समितीने याबाबत पहिली तक्रार दाखल केली आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये दुसरी तक्रार केली. त्या वेळी समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक, श्री. महेश लाड आणि पत्रकार विजय भोर यांनी सिडकोच्या दक्षता अधिकार्यांची भेट घेऊन या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार केली होती. सिडकोने याबाबत त्वरित कारवाई करत या बांधकामाचे निष्कासन केले.
या कारवाईमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराची सुरक्षा सुनिश्चित झाली आहे. समितीने राज्यातील गड-किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामांवरही त्वरित कारवाई करून तिथले ऐतिहासिक पावित्र्य आणि संस्कृती जपण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: