रुपेश पाटील यांच्याविरोधात शिंदे गटात बंडखोरी
उरण (प्रतिनिधी): उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून, पक्षाच्या १५ पदाधिकाऱ्यांनी रुपेश पाटील यांच्या मनमानी कारभाराविरोधात सामूहिक राजीनामे दिले आहेत.
जेष्ठ नेते कृष्णा बा. पाटील, संपर्क प्रमुख राजन म्हात्रे, उलवे शहर प्रमुख भरत देशमुख यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. उलवे येथील हॉटेल स्वाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत या राजीनाम्यांची घोषणा करण्यात आली.
कृष्णा पाटील यांनी सांगितले की, "गेल्या दोन वर्षांपासून रुपेश पाटील यांच्या भयानक राजकारणाने सर्व पदाधिकारी त्रस्त झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला बदनाम करणाऱ्या कृती येथे केल्या जात आहेत. वरिष्ठ पातळीवर अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला."
निवडणुकीच्या काळात झालेल्या या सामूहिक राजीनाम्यांमुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०४:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: