काँग्रेसचे ‘घोषणापत्र’ नव्हे, ते तर भ्रष्टाचार आणि ‘घोटाळापत्र’ ! नाशिकच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

 


काँग्रेसचे ‘घोषणापत्र’ नव्हे, ते तर भ्रष्टाचार आणि ‘घोटाळापत्र’ असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या प्रचारसभेत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केली. तेलंगणा आणि कर्नाटकात खोट्या आश्वासनांचे दुकान थाटल्यानंतर आता ते महाराष्ट्रात आले असून, आपल्या फायद्यासाठी जनतेवर करांचा भार लादत आहेत, असा आरोप त्यांनी केला. एका बाजूला महाआघाडीचे घोटाळापत्र तर दुसरीकडे महायुतीचे विकासपत्र असा संघर्ष महाराष्ट्रात होणार असल्याचे मोदी म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत त्यांनी काँग्रेसच्या घोटाळ्यांवर टीका केली. 

मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसला परजीवी पक्ष ठरवून त्यांच्यावर जातीयतेचे राजकारण करण्याचा आरोप केला. ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी आणि दलितांमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसने ‘गरीबी हटाओ’चा नारा दिला, मात्र प्रत्यक्षात गरीब अधिक गरिबीत ढकलले गेले. उलट त्यांच्या सरकारने २५ कोटी लोकांना गरिबीच्या कचाट्यातून बाहेर काढल्याचे त्यांनी नमूद केले. उज्ज्वला गॅस योजना, जलजीवन मिशन, पंतप्रधान आवास योजना यांसारख्या योजना चालू ठेवण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्यमातून थेट खात्यात निधी जमा होत असून, महायुती सरकार सत्तेत आल्यास ही रक्कम वाढवली जाईल. तसेच, इथेनॉल उत्पादन वाढवून देशाच्या इंधन खर्चात बचत झाली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात पायाभूत सुविधांमध्ये केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे सांगून काँग्रेसला महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला. अटल सेतू, वाढवण बंदर, मेट्रो प्रकल्प, आणि समृद्धी महामार्गाचे काम काँग्रेसने थांबवण्याचा प्रयत्न केला, असे नमूद करत महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन मोदींनी केले. 

महाराष्ट्राच्या आयटी पार्कमुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि संरक्षण क्षेत्रातील योगदानाची मोदींनी प्रशंसा केली. देशाच्या सशक्ततेत नाशिकची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर काँग्रेस आघाडीवर देशाचे संरक्षण क्षेत्र कमजोर करण्याचा आरोपही त्यांनी केला. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करणे ही बाबासाहेबांना दिलेली श्रद्धांजली असल्याचे सांगत काँग्रेसने बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर न ठेवण्याचे पाप केले आहे, असे मोदी म्हणाले.

सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

काँग्रेसचे ‘घोषणापत्र’ नव्हे, ते तर भ्रष्टाचार आणि ‘घोटाळापत्र’ ! नाशिकच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात काँग्रेसचे ‘घोषणापत्र’ नव्हे, ते तर भ्रष्टाचार आणि ‘घोटाळापत्र’ !  नाशिकच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात Reviewed by ANN news network on ११/०८/२०२४ १०:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".