"आणीबाणीत काँग्रेसनेच केले संविधानाचे उल्लंघन"
पुणे (प्रतिनिधी) - काँग्रेस पक्षाने तीन राज्यांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या गॅरंटी कार्डला "फसवणुकीचा जाहीरनामा" असे संबोधले.
जावडेकर यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांतील काँग्रेस सरकारच्या कामगिरीवर टीकास्त्र सोडले. "हिमाचल प्रदेशात एक लाख नोकऱ्या देण्याऐवजी दीड लाख सरकारी पदे रद्द करण्यात आली. पुढील दोन वर्षांसाठी भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकमधील बेरोजगार भत्त्याबाबत बोलताना जावडेकर म्हणाले, "दोन लाख तरुणांना दरमहा ३००० रुपये देण्याचे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. महिलांना २००० रुपयांचे मासिक पेन्शन गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे." तेलंगणामध्येही अशीच परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्योग क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेताना जावडेकर म्हणाले, "२०१४ मध्ये देशात केवळ ४०० स्टार्टअप होते. आज त्यांची संख्या १ लाख ४० हजारांवर पोहोचली आहे. मोदी सरकारच्या काळात उद्योगांचे खरे लोकशाहीकरण झाले असून, नव्या उद्योजकांना संधी मिळत आहे."
महाविकास आघाडीने संविधान बदलण्याचा आणि आरक्षण संपवण्याचा केलेला प्रचार खोटा असल्याचे सांगताना जावडेकरांनी १९७५ च्या आणीबाणीचा संदर्भ दिला. "काँग्रेसनेच आणीबाणीत नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले होते," असे ते म्हणाले.
येत्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना काँग्रेसच्या फसवणुकीची जाणीव झाली असून, महायुतीला भव्य विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०४:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: