स्वरसागरने दिली तरुण कलावंतांना नवी दिशा : श्रावण हर्डीकर
पिंपरी-चिंचवड (वार्ताहर): पिंपरी-चिंचवड फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाने कलाविश्वात नवा अध्याय लिहिला. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठेचा स्वरसागर पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. वेंकटेश कुमार यांना तर युवा स्वरसागर पुरस्कार चिंचवडचे हिमांशु तांबे यांना प्रदान करण्यात आला.
"गेल्या पंचवीस वर्षांपासून स्वरसागर हे व्यासपीठ दिग्गज आणि नवोदित कलाकारांसाठी वरदान ठरले आहे. या महोत्सवामुळे उद्योगनगरीला सांस्कृतिक नगरीचे वैभव प्राप्त झाले आहे," असे मत श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धा हर्डीकर-शिंदे यांच्या शिवस्तुतीपासून झालेल्या कथक नृत्याविष्काराने झाली. त्यांनी तीन घराण्यांच्या शैलींचा समन्वय साधत उत्कृष्ट सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. वेंकटेश कुमार यांनी राग यमन-कल्याण, बागेश्री यांसह विठ्ठलाचा अभंग आणि कर्नाटकी भजन सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, मल्लाप्पा कस्तुरे यांच्यासह संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविक केले तर प्रतिभा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
Reviewed by ANN news network
on
११/०६/२०२४ ०८:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: