निवडणूक आचारसंहितेत अवैध दारूविरोधात कारवाई; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त"
पुणे, अहिल्यानगर, सोलापुरात अवैध दारू विक्रेत्यांवर छापे"
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने केलेल्या कारवाईत २३ लाख ७३ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी ही माहिती दिली.
१५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांत विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २७ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यापैकी १४ वारस आणि १३ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान २६,८०० लिटर अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे रसायन, ३,४३८ लिटर अवैध गावठी हातभट्टी दारू, १४४ बॉटल बनावट मद्य आणि मद्य वाहतुकीची तीन वाहने जप्त करण्यात आली. या प्रकरणी १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुय्यम निरीक्षक व्ही.एम. माने आणि सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलिम शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. विभागाने नागरिकांना अवैध दारू व्यवसायाची माहिती देण्यासाठी ०२०-२९९११९८६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०४:३६:०० PM
Rating:


.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: