मुंबईत ११ पैकी फक्त २ मराठी उमेदवार; काँग्रेसवर टीकास्त्र
मुंबई - विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने मुंबईत दिलेल्या अकरा उमेदवारांपैकी केवळ दोनच मराठी उमेदवार असल्याचा गंभीर आरोप मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केला आहे. या मराठीद्वेषी धोरणाबाबत शिवसेना (उबाठा) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान त्यांनी दिले.
भाजपा मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, "काँग्रेसने या निवडणुकीत वरिष्ठ मराठी नेत्यांना डावलले आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून ते आजतागायत काँग्रेसची मराठी विरोधी भूमिका कायम आहे."
त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कारभाराची तुलना करताना महाविकास आघाडीला स्थगितीचे वाहक तर महायुतीला प्रगतीचे शिलेदार असे संबोधले. "महाराष्ट्रातील जनता आम्हालाच कौल देऊन महायुती सरकार सत्तेवर आणेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेलार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धच्या आरोपांवरही टीका केली. "सात दिवसांत पुरावे सादर न केल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करू," असा इशाराही त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२४ ०५:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: