चिंचवड (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी त्यांच्या काकडे पार्क, चिंचवडगाव येथील जनसंपर्क कार्यालय देखील भोईर यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपलब्ध करून दिले आहे. हे कार्यालय आता भाऊसाहेब भोईर यांचे चिंचवड येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालय असेल. या कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असल्याची माहिती कोऱ्हाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भाऊसाहेब भोईर यांच्या उमेदवारीमुळे चिंचवड मतदार संघात निवडणुकीची चुरस वाढली आहे. कोऱ्हाळे यांच्या पाठिंब्यामुळे निवडणुकीच्या मैदानात भोईर यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि सुमारे पावणेसात लाख मतदार असलेल्या या मतदार संघात तीन दशकांहून अधिक राजकीय अनुभव असलेले भाऊसाहेब भोईर निवडणूक लढवत आहेत. या अनुभवी उमेदवाराला आता "ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल", सकल धनगर समाज, सकल मातंग समाज आणि आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे अनंत कोऱ्हाळे यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे प्रचारात मोठी मुसंडी मारली आहे.
भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधताना सांगितले की, "मी निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहे, आणि यावेळी चिंचवडचाच आमदार होणार आहे." निवडणुकीत प्रचाराच्या वेगाने मुसंडी मारत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोऱ्हाळे म्हणाले, "भाऊसाहेब भोईर हे माझे राजकीय गुरू आणि मोठे बंधू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि मला अनमोल मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळेच, शिवसेनेचा कार्यकर्ता असलो तरी मी चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा देत आहे. चिंचवडच्या आमदाराच्या भूमिकेत त्यांची निवड होणे गरजेचे आहे."
या पत्रकार परिषदेला अनंत कोऱ्हाळे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते, मतदार आणि भोईर यांचे समर्थक उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०१:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: