"उल्हासनगरच्या भरारी पथकातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, निलंबनाची कारवाई"
ठाणे : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र. 3 आणि 6 मधील पाच कर्मचाऱ्यांवर निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याने आणि कर्तव्य पालनात निष्काळजीपणा केल्याने तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी श्री.संकेत चनपूर, श्री.संदीप शिरसवाल, श्री.आण्णासाहेब बोरूडे तसेच पोलीस हवालदार श्री.विश्वनाथ ठाकूर आणि पोलीस नाईक श्री.राजरत्न बुकटे यांचा समावेश आहे.
दि. 18 ऑक्टोबर 2024 रोजी, श्री.बबन आमले आणि त्यांचे मित्र नितीन शिंदे हे अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांकडून फूल मालाची विक्री करून, ती रक्कम घेवून उल्हासनगरला जात होते. त्यावेळी भरारी पथकाचे प्रमुख श्री.संदीप शिरसवाल आणि श्री.संकेत चनपूर यांनी त्यांच्याकडून 7 लाख 50 हजार रुपये रोख घेतले. त्यानंतर या पैशांबाबत धमकी देत 85 हजार रुपये जप्त केले.
या घटनेची तक्रार 19 ऑक्टोबर 2024 रोजी पोलिस उप-आयुक्त यांच्याकडे करण्यात आली. यावर पोलीस विभागाने तपास सुरू केला आणि 28 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विजयानंद शर्मा यांच्याकडे अहवाल सादर केला. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कर्तव्य पालनात कसूर केल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर 8 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्याद्वारे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले गेले. त्यानुसार, संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे, निवडणूक कार्यात पारदर्शकता आणि कर्तव्यदक्षतेची खात्री करण्यात आली आहे.
यापुढे, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व पथकांना योग्य आणि निष्पक्ष कार्य करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी दिले आहेत.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०१:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: