दिघी येथील सभेत पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला
दिघी (पिंपरी-चिंचवड) : महाविकास आघाडीकडे बोलण्यासाठी मुद्दाच नसल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
"गेल्या दहा वर्षांत महेश लांडगे यांनी केलेली विकासकामे पाहिली आहेत. संविधान भवन, न्यायालय संकुल, संतपीठ अशी अनेक महत्त्वपूर्ण कामे त्यांनी केली आहेत," असे मुंडे यांनी सांगितले. विरोधकांकडून केवळ विरोधासाठी विरोध केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
"महाविकास आघाडीकडे विकासाचा संकल्प राहिलेला नाही. त्यामुळे 'खोटं बोल पण रेटून बोल' अशी त्यांची जुमलेबाजी सुरू आहे," असा टोला त्यांनी लगावला. विकासकामांच्या जोरावर लांडगे यांची हॅट्रिक निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"काम करणाऱ्या माणसाला राजकारणात टिकवून ठेवण्याची जबाबदारी जनतेची नाही का?" असा सवाल करत मुंडे यांनी मतदारांना आवाहन केले. या वेळी त्यांनी महिलांसाठी महायुती सरकारने केलेल्या कामांचाही आढावा घेतला.
सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: