पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील ऐतिहासिक तुळशीबाग परिसरात शेकडो पथारी व्यावसायिक, दुकानदार, स्थानिक रहिवासी आणि कामगारांनी एकत्र येऊन भव्य सामूहिक लक्ष्मी पूजनाचे आयोजन केले.
छोटे व्यावसायिक असोसिएशन तुळशीबागचे ट्रस्टी सागर दहीभाते यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ धावडे आणि सरचिटणीस अरविंद तांदळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
संपूर्ण तुळशीबाग परिसरात हजारो पणत्या, फुलांची आरास आणि रांगोळ्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशात न्हालेल्या परिसरात व्यापारी आणि ग्राहकांनी दीपोत्सवाचा आनंद लुटला. विशेषतः महिला आणि लहान मुलांनी या सजावटीचे फोटो काढण्यात मोठा रस दाखवला.
"संघटित प्रयत्नांतूनच यश मिळते. या सामूहिक पूजनामागे व्यापाऱ्यांमधील बांधीलकी वाढवण्याचा उद्देश आहे," असे अध्यक्ष धावडे यांनी सांगितले. सरचिटणीस तांदळे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत युवा नेतृत्वाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सागर गुळुमकर, आकाश देसाई, नरेश माळवे, मयूर शेळके, अलका नवगिरे, राजेश सनके, दिनेश दहीभाते आणि पिंटू बिरादार यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
Reviewed by ANN news network
on
११/०२/२०२४ ११:१७:०० AM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: