उरण (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीदरम्यान उरणचे उमेदवार महेश बालदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून, अखिल आगरी समाज परिषदेने त्यांच्याकडे जाहीर माफीची मागणी केली आहे.
बालदी यांनी एका जाहीर सभेत "मी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेच्या निवडणुकीला नव्हे तर विधान परिषदेच्या निवडणुकीला उभा आहे" असे वक्तव्य करून आगरी समाजाचा अपमान केल्याचा आरोप परिषदेने केला आहे. याशिवाय अदानी विमानतळासंदर्भातील त्यांचे वक्तव्यही वादग्रस्त ठरले आहे.
परिषदेचे अध्यक्ष दशरथ का. पाटील, कार्याध्यक्ष जे.डी. तांडेल आणि सरचिटणीस दिपक म्हात्रे यांनी पत्राद्वारे या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकारणापासून अलिप्त असलेल्या या संस्थेने बालदी यांना व्हाट्सअपवरही पत्र पाठवले असून, आठ दिवसांत माफी न मागितल्यास पुढील भूमिका ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात येणार आहे.
"अखिल आगरी समाज परिषद ही शिखर संस्था असून, कै. दि.बा. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी या संस्थेच्या विकासासाठी योगदान दिले आहे. समाजाची दिशाभूल करणारी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत," असे अध्यक्ष दशरथ का. पाटील यांनी स्पष्ट केले.
परिषदेने स्पष्ट केले की, या मागणीमागे कोणताही राजकीय हेतू नसून, केवळ समाजाच्या हिताचा विचार आहे. आता बालदी यांची प्रतिक्रिया काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: