"महाविकास आघाडीने उद्योगांचे केले नुकसान" - सावंत
चिंचवड (प्रतिनिधी) -काँग्रेसच्या साठ वर्षांच्या राजवटीत कामगार वर्गाची पिळवणूक झाली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय आणि सन्मान मिळाल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन येथे आयोजित कामगार संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
"मोदी सरकारने लेबर वेलफेअर बोर्ड आणि लेबर कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्डद्वारे प्रत्येक कामगाराला लेबर कार्ड दिले आहे. या कार्डामुळे मुलांचे शिक्षण, स्वतःचे घर आणि आरोग्यविषयक लाभ मिळणे सुलभ झाले आहे," असे सावंत यांनी सांगितले.
महायुती सरकारने रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि बंदर कनेक्टिव्हिटीवर भर दिल्यामुळे विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंती ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याउलट, महाविकास आघाडीच्या काळात अनेक उद्योग राज्याबाहेर गेल्याचीही टीका त्यांनी केली.
या मेळाव्यास उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, पक्ष कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि हजारो कामगार उपस्थित होते.
विशेष म्हणजे चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या ईएसआय रुग्णालयाचे काम एका वर्षात सुरू करण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.
"राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी शंकर जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०४:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: