चिंचवड - चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे उमेदवार मारुती साहेबराव भापकर यांच्या कोपरा सभांचा परवाना पोलिस प्रशासनाने रद्द केला आहे.
भापकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी केशवनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी चौक, बिजलीनगर चौक, दळवीनगर चौक आणि गुरुद्वारा चौक या ठिकाणी संध्याकाळी ५:३० ते रात्री १०:०० या वेळेत कोपरा सभा घेण्यासाठी परवानगी मागितली होती.
चिंचवड पोलिस स्टेशनने त्यांच्या पत्रान्वये, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना याच भागात याच वेळेत कोपरा सभा व पदयात्रेची पूर्वपरवानगी दिली असल्याने, एकाच ठिकाणी दोन कार्यक्रम टाळण्यासाठी भापकर यांचा अर्ज नामंजूर करण्याची शिफारस केली.
पोलिस उपनिरीक्षक, एक खिडकी कक्ष यांनी या शिफारशीच्या आधारे भापकर यांचा परवाना अर्ज नामंजूर केला आहे. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परवानगी नाकारल्याने भापकर यांच्या प्रचार मोहिमेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वराज पक्षाचा तीव्र निषेध
या कृतीचा महाराष्ट्र स्वराज पक्षाने तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्यांच्या प्रचारसभांना अडथळा निर्माण झाला आहे. त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०७:४९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: