चिंचवड (वृत्तसेवा) - पिंपरी-चिंचवड शहरात महाविकास आघाडीच्या विजयासाठी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात महत्त्वपूर्ण राजकीय संदेश देण्यात आला. आकुर्डी येथील हॉटेल किरीयाडमध्ये झालेल्या या मेळाव्यात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्यात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या प्रमुख घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
मेळाव्यात पिंपरी मतदारसंघाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर, भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासह संग्राम तावडे, विष्णुपंत नेवाळे, श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
कैलास कदम यांनी या वेळी बोलताना सांगितले की, "महाविकास आघाडीसोबत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतही आघाडी धर्म पाळला. विधानसभा निवडणुकीतही सर्व घटक पक्षांसोबत प्रचारात आघाडीवर राहू. राज्यात सरकार बदलण्यासाठी जीवाचे रान करू."
राहुल कलाटे यांनी आपल्या भाषणात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन केले. महागाई, बेरोजगारी आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्याने महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये असलेली एकजूट अधोरेखित केली असून, आगामी निवडणुकीत विजयाची खात्री व्यक्त करण्यात आली.
Reviewed by ANN news network
on
११/०५/२०२४ ०७:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: