103 सोसायट्यांना नव्या अध्यादेशाचा लाभ
पुणे : (प्रतिनिधी) : पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने नव्याने काढलेल्या अध्यादेशानुसार 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावरील जागा आता मालकी हक्काने मिळणार आहेत. या निर्णयाचा शहरातील 103 सोसायट्या, चार हजार कुटुंबे आणि 80 हजार पुणेकरांना लाभ होणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.
नव्या अध्यादेशामध्ये सोसायट्यांसाठी नियमावली, दंड आणि अन्य कायदेशीर बाबींबाबत स्पष्टता करण्यात आली आहे. या पूर्वीच्या अध्यादेशात अनेक बाबींविषयी स्पष्टता नसल्याने सुधारित अध्यादेश काढण्यात आला.
दरम्यान, मिसाळ यांनी बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप आरक्षणाबाबतही महत्त्वाची माहिती दिली. सुमारे सात एकरच्या तीन भूखंड वगळण्याच्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली असून, सर्व भूखंडधारकांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ सहकारनगर परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. गजानन महाराज चौकापासून सुरू झालेली ही फेरी राजीव गांधी ई लर्निंग स्कूल येथे संपन्न झाली. या प्रचारफेरीस महेश वाबळे, गणेश घोष, अनिल जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०८:५६:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: