स्वर्गीय गिरीश बापट यांच्या कार्यालयात रासने यांची मुख्य निवडणूक कचेरी
पुणे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे महायुती उमेदवार हेमंत रासने यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन काल 95 वर्षीय माजी नगरसेविका मीराताई पावगी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वर्गीय गिरीश बापट यांच्या ऐतिहासिक कार्यालयातच ही निवडणूक कचेरी सुरू करण्यात आली असून, कार्यक्रमाध्यक्षस्थानी शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना रासने यांनी महायुती सरकारच्या महिला धोरणांचा आढावा घेतला. "मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेसह महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारी दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाच्या समावेशाच्या ऐतिहासिक निर्णयाचीही माहिती दिली.
कार्यक्रमानंतर कसबा गणपतीपासून महिलांची पदयात्रा काढण्यात आली. साततोटी चौक, कस्तुरी चौक, घोरपडे पेठमार्गे समता भूमीपर्यंत झालेल्या या पदयात्रेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास स्वरदा बापट, रुपाली ठोंबरे, अश्विनी पवार, वैशाली नाईक, सुरेखा पाषाणकर, कल्पना जाधव, आरती कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर, सुप्रिया कांबळे, सुरेखा कदम-पाटील यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०८:५०:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: