पिंपरी : प. पू. भगवान बाबांनी सुरू केलेला सावरगाव घाट, ता. पाटोदा, जि. बीड येथे दरवर्षी होणारा दसरा मेळावा देशभरात प्रसिद्ध आहे. या परंपरेचे पुढील पिढीनेही यथायोग्य पालन केले आहे. लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांनी ऊसतोड कामगार आणि बहुजन वंचितांसाठी हा दसरा मेळावा सुरु ठेवला होता. त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी हा मेळावा यशस्वीपणे पुढे चालवला आहे. हा देशातील सर्वांत मोठ्या दसरा मेळाव्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
या शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याला पिंपरी चिंचवड शहरातून पाच हजार नागरिक सहभागी होतील, अशी माहिती पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली. पिंपरी चिंचवड शहर दसरा कृती समितीने बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, राजू दुर्गे, संजय मंगोडेकर, गणेश वाळुंजकर, अण्णा गर्जे, दीपक नागरगोजे, भागवत खेडकर, नंदू भोगले आणि ज्ञानेश्वर नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते.
भगवान भक्ती गडावर होणाऱ्या या मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह राजस्थान, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि देशभरातील भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे साहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या ३० वर्षांपासून या मेळाव्याच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या आणि बहुजन वंचितांच्या समस्यांवर आवाज उठवला आहे, आणि पंकजाताई मुंडे या परंपरेला पुढे नेत आहेत.
या वर्षीच्या दसरा मेळाव्याला वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच देशातील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मोरेश्वर शेडगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार केशव घोळवे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: