रामाच्या विषयावरून भोसरीत राजकीय वातावरण तापले
पिंपरी : भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून 'राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी' या घोषणेने मते मागितली जात असताना, पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पूर्वी केलेल्या श्रीरामाविषयीच्या वक्तव्यावरून माजी महापौर राहुल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
"राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांविषयी केलेली वादग्रस्त विधाने विसरता येणार नाही. अशा पक्षाला राम-कृष्णाचे नाव घेण्याचाही अधिकार नाही," असे जाधव यांनी स्पष्ट केले.
आमदार महेश लांडगे यांनी अयोध्या राममंदिर स्थापनेनिमित्त काढलेली रथयात्रा, चिखली-टाळगाव येथील श्री संत विद्यापीठाची स्थापना आणि गोरक्षणासाठी केलेले कार्य यांचा उल्लेख करत, जाधव यांनी लांडगेच खरे हिंदुत्वरक्षक असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीतर्फे भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला जागा देण्यात आली असून, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धार्मिक मुद्दा ऐरणीवर आला आहे.
"देव, देश आणि धर्मासाठी कार्य करणाऱ्या महेश लांडगे यांना जनतेने पुन्हा एकदा पाठिंबा द्यावा," असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: