भारत-स्पेन सहकार्याचे आरोग्यसेवेत नवे पर्व
मुंबई : महाराष्ट्रातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये मोठी क्रांती घडवणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज जाहीर झाला. सुमीत ग्रुप एंटरप्रायझेस आणि स्पेनची एसएसजी मेट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने १६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) १०८' हा प्रकल्प राज्यभरात राबविला जाणार आहे.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ पेरेझ कस्तीयोन यांनी मुंबईत या प्रकल्पांतर्गत नव्या रुग्णवाहिकांची पाहणी केली. भारत-स्पेन द्विपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी भारतातील आरोग्यसेवा सुधारणांचे कौतुक केले.
या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक जीवरक्षक रुग्णवाहिका, बेसिक जीवरक्षक रुग्णवाहिका, नवजात शिशूंसाठी विशेष रुग्णवाहिका, त्वरित प्रतिसाद देणाऱ्या बाईक, जलवाहिनी रुग्णवाहिका, वैद्यकीय मदत पुरविणारे ड्रोन आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश असणार आहे.
"या प्रकल्पातून भारत-स्पेन संबंध अधिक दृढ होतील आणि पंतप्रधान मोदींच्या 'मेक इन इंडिया' व 'आत्मनिर्भर भारत' या उपक्रमांना बळकटी मिळेल," असे सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे भारतातील उपप्रमुख सुमीत साळुंके यांनी सांगितले.
प्रत्येक रुग्णवाहिका मोबाईल डेटा टर्मिनल्स, टॅबलेट पीसी, जीपीएस, सीसीटीव्ही आणि ट्रीयाज सिस्टीम यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हा प्रकल्प पाच टप्प्यांत राज्यभरात कार्यान्वित केला जाणार आहे.
एसएसजी मेट्रिक्स एसएलचे उपाध्यक्ष दिएगो प्रीएतो ज्युनियर यांनी या प्रकल्पाद्वारे भारतातील आरोग्यसेवांमध्ये अर्थपूर्ण बदल घडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. रस्ते अपघात, गंभीर आजार, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आरोग्यविषयक आणीबाणीच्या प्रसंगी या रुग्णवाहिका तत्काळ सेवा देतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: