भोसरीत भाजपला धक्का; माजी नगरसेविका भीमाबाई फुगे यांचा शरद पवार गटात प्रवेश
भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई पोपटराव फुगे यांनी गुरुवारी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
भीमाबाई फुगे यांच्यासोबत त्यांचे सहकारी सम्राट फुगे, प्रसाद कोलते, प्रशांत लांडगे, सुदेश लोखंडे, गणेश कंद यांनीही पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे भोसरी गावठाणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधून २,७७८ मतांनी विजयी झालेल्या भीमाबाई फुगे यांनी स्थानिक नेतृत्वाच्या दबावाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. "शरद पवार साहेबांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे. अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून शहराला एक सुसंस्कृत नेता मिळणार आहे," असे त्यांनी सांगितले.
भीमाबाई फुगे यांचा भोसरी गावठाण भागात मोठा प्रभाव आहे. त्यांचे माहेर कासारवाडीचे असून, त्यांचे भाऊ दत्तात्रेय लांडगे आणि भावजय सुरेखा लांडगे हे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. दिवंगत सदाशिवराव फुगे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्या जपत आहेत.
यापूर्वी मोशीतील लक्ष्मण सस्ते यांनीही भाजप सोडून अजित गव्हाणे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. सम्राट फुगे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांची मोठी फळी तयार असून, त्यांच्या माध्यमातून गव्हाणे यांना मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: