शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. इनामदार यांना जीवनगौरव
पुणे : पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.ए. इनामदार यांना प्रदान करण्यात आला. आझम कॅम्पस येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी.के. थोरात व पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल-श्रीफळासह जी.के. थोरात लिखित 'तपस्वी' हे पुस्तक डॉ. इनामदार यांना भेट देण्यात आले. पुणे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
या कार्यक्रमास पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष प्रा. संतोष थोरात, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर, पुणे शहर ज्युनिअर कॉलेज टीडीएफचे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुणे माध्यमिक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजयराव कचरे, माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अशोक धालगडे, अमजद पठाण तसेच संघटनेचे इतर पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी आणि माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रदान केला जातो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: