काँग्रेसला मोठा धक्का; ज्येष्ठ नेते रवी राजा भाजपात दाखल
मुंबई : राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते रवी राजा यांच्यासह उबाठाचे उपविभागप्रमुख बाबू दरेकर यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या वेळी मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार तमिल सेल्वन, आमदार पराग शहा, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. रवी राजा यांची भाजपा मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आमदार शेलार यांनी जाहीर केले.
"२३ वर्षे बेस्टचे सदस्य म्हणून प्रभावी कामगिरी बजावलेल्या राजा यांचा अनुभव आणि जनसंपर्क याचा भाजपाला निश्चितच फायदा होईल," असे फडणवीस म्हणाले. राजा यांच्या संपर्कामुळे आगामी काळात काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते भाजपात प्रवेश करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सायन कोळीवाडा परिसरातील राजा यांच्या प्रवेशाने आणि घाटकोपर परिसरातील दरेकर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढणार असल्याचे आमदार शेलार यांनी सांगितले. यावेळी युवक काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक सावंत यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला.
महायुतीतील काही ठिकाणी झालेल्या बंडखोरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, परस्परविरोधी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यश मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: