उरण (प्रतिनिधी) - कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि माजी विद्यार्थी संघाने यंदाही आपली सामाजिक बांधिलकी जपत बेलडोंगरी येथील आदिवासी कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
सारडे ग्रामपंचायत हद्दीतील बेलडोंगरी येथे आयोजित या कार्यक्रमात २५ महिलांना साड्या, २७ पुरुषांना कपडे तसेच २४ मुलांना शालेय साहित्यासह कपडे आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य के.ए. शामा यांनी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. या उपक्रमासाठी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांकडून सुमारे ५४ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेला दिवाळी फराळ आदिवासी बांधवांना देऊन त्यांच्यासोबत दिवाळी पहाट साजरी केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर, तेजस ठाकूर आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: