पत्रकारांसाठी भाजपाचे सुसज्ज मीडिया सेंटर; फडणवीसांकडून पाहणी
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने कफ परेड येथे सुरू केलेल्या अत्याधुनिक मीडिया सेंटरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला आणि निवडणुकीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर मोकळेपणाने चर्चा केली.
या भेटीदरम्यान प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजपा प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन यांची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली, तर त्यांच्या विनोदी शैलीमुळे वातावरण प्रसन्न झाले होते.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदांसाठी भव्य सभागृह, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी स्टुडिओ आणि आधुनिक संपर्क यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच वृत्तपत्रांच्या पत्रकारांना वार्तासंकलनासाठी मोठा लाभ होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सेंटरमधील अत्याधुनिक सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत फडणवीस यांनी पत्रकार बंधू-भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयींचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीच्या काळात या सेंटरचा पत्रकारांना मोठा उपयोग होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: