विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील सोनारी गावाच्या जमिनी राष्ट्रीय प्रकल्प जेएनपीटीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पामुळे सोनारी गाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाले असून, अनेक मोठे प्रकल्प आणि उद्योगधंदे याठिकाणी उभारले गेले आहेत. मात्र, या सर्व प्रकल्पांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त, सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी मिळालेल्या नाहीत. यामुळे स्थानिक बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
सोनारी गावाच्या शेजारी असलेल्या मे. स्पीडी बफर कंपनी काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर कंपनीचा ठेका मे. हिंद टर्मिनल प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्यात आला. पूर्वी या कंपनीत सोनारी गावातील स्थानिक लोक काम करत होते, परंतु आता कंपनी प्रशासनाने कोणालाही कामावर घेणार नाही असे कळवले आहे. परिणामी, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय झाल्याने या युवकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
युवा संघटना सोनारीच्या पदाधिकाऱ्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवत, १५ दिवसांच्या आत स्थानिक बेरोजगारांना नोकरीत सामावून घेतले नाही, तर मे. हिंद टर्मिनल लिमिटेड कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात जेएनपीटी प्रशासन आणि हिंद टर्मिनल कंपनी प्रशासनाला पत्रव्यवहाराद्वारे कळवण्यात आले आहे.
युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर न्याय मिळवण्यासाठी आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, विभागीय आयुक्त कोकण भवन, जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार उरण, पोलीस प्रशासन, आणि ग्रामसुधारणा मंडळ सोनारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांवर होणाऱ्या अन्यायाचे निराकरण लवकरात लवकर करण्याची मागणी युवा संघटनेने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: