विठ्ठल ममताबादे
उरण : श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि समाजात महिलांना योग्य मानसन्मान मिळावा या उद्देशाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने, समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या नऊ महिलांचा (नवदुर्गांचा) सन्मान करण्याचा कार्यक्रम रँकर्स अकॅडमी, कोप्रोली चौक, उरण येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी प्रीती नायर (सामाजिक क्षेत्र), डॉ. श्वेता इंगोले (वैद्यकीय क्षेत्र), सीमा भोईर (पत्रकारिता), सरोज म्हात्रे (बचत गट), सुगंधा म्हात्रे (आशा वर्कर), सुगंधा पाटील (स्वच्छता कर्मचारी), ऍडवोकेट दीपाली गुरव (न्यायदान क्षेत्र), सुनीता वर्तक (शिक्षण क्षेत्र) आणि कनिष्का नाईक (पोलीस प्रशासन) या नवदुर्गांचा शाल, गुलाब पुष्प, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह आणि साडी देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुनील वर्तक आणि निवेदिका हेमाली म्हात्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील वर्तक यांनी केले. सत्कार झालेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांच्या दैनंदिन जीवनातील समस्या आणि त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला. उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर सुधीर मुंबईकर, सुप्रिया मुंबईकर, रँकर्स अकॅडमीचे अध्यक्ष प्रतीक मुंबईकर, सुनीता वर्तक आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रीती नायर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सुप्रिया मुंबईकर यांनी महिलांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, संपर्कप्रमुख ओमकार म्हात्रे, सचिव प्रेम म्हात्रे आणि इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: