१८ महिन्यांत ५० हजार नागरिकांच्या समस्या सोडवल्या - रासने
पुणे (प्रतिनिधी) :कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपा-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी आज अनोख्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात महायुतीची प्रभावी एकजूट दिसून आली.
कसबा गणपतीचे दर्शन घेऊन सुरू झालेल्या कार्यक्रमात महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर शहराच्या वाहतुकीला गती देणाऱ्या पुणे मेट्रोतून मंडई स्टेशन ते स्वारगेट असा प्रवास करत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
"गेल्या १८ महिन्यांत रस्त्यावर टेबल मांडून ५० हजारांहून अधिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आम्ही यशस्वी ठरलो," असे सांगत रासने यांनी पुन्हा संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. महायुतीच्या एकजुटीने उमेदवारीचे विजयात रूपांतर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना मंत्री मोहोळ यांनी मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचे सांगितले. स्वर्गीय गिरीश बापट आणि मुक्ताताई टिळक यांच्या कष्टातून कसब्यात झालेल्या विकास कामांचाही त्यांनी उल्लेख केला.
मंत्री पाटील यांनी कसबा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावल्याचे सांगितले. जमलेल्या जनसमुदायावरून रासने यांना मोठा पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: