मारुती भापकर यांचा उमेदवारी अर्ज बाद!; विरोधी उमेदवाराचे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत भापकर यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
पुणे (विशेष प्रतिनिधी): भोसरी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांच्या उमेदवारी अर्जाच्या शपथपत्रातील महत्त्वाचे पृष्ठ क्रमांक २३ जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्याचा गंभीर प्रकार काल दि. २९ रोजी घडला होता. आज झालेल्या छाननीत भापकर यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. दरम्यान भापकर यांनी छाननीपूर्वीच निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांना या पदावरून तात्काळ हटवून त्या जागी अन्य सक्षम अधिका-याची नेमणूक करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तांत्रिक दोष सुधारण्याची संधी आपणास द्यावी अशी मागणी केली आहे.
या मतदारसंघातील शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या सांगण्यावरून निवडणूक प्रक्रियेतील अधिका-यांनी आपल्या शपथपत्रातील पान गहाळ केले असावे असा संशयही भापकर यांनी व्यक्त केला आहे, भापकर यांनी जरुर भासल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
भापकर यांच्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी विरोधी उमेदवार अजित गव्हाणे यांच्या दबावाखाली निरीक्षक कर्मचाऱ्यांनी हा प्रकार घडवून आणला. "गव्हाणे यांनी आदल्या दिवशी त्यांचे नामनिर्देशन पत्र सादर केले असतानाही ते आपण अर्ज सादर करत असताना तासभर कार्यालयात थांबले होते. त्यांच्या उपस्थितीतच आपल्या शपथपत्रातील महत्त्वाचे पृष्ठ गायब करण्यात आले," असा स्पष्ट आरोप भापकर यांनी केला आहे.
त्यांच्या या तक्रार अर्जानुसार २.३० वाजता सादर केलेल्या उमेदवारी अर्जाची तपासणी तीन वेगवेगळ्या टेबलांवर करण्यात आली. या दरम्यान भापकर यांचे लक्ष विचलित करून, त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत शपथपत्रातील पृष्ठ काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. पृष्ठ गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्याकडे तक्रार केली. मात्र, लबडे यांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला.
"निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझी तक्रार ऐकून न घेता उलट माझ्यावरच आरोप केले. हा स्पष्टपणे पक्षपाती कारभार आहे," असे भापकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करून सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.
भापकर यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तांत्रिक दोष सुधारण्याची संधी देण्याची मागणी केली आहे. "निवडणूक आयोगाने योग्य दखल न घेतल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील," असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: