दहा वर्षांच्या अधोगतीचा जनता घेणार हिशेब - खासदार निलेश लंके
भोसरी (प्रतिनिधी) : भोसरी विधानसभा मतदारसंघातील गेल्या दहा वर्षांच्या अधोगतीची परतफेड करण्यासाठी स्थानिक जनता आतुर असून, अजित गव्हाणे यांच्या रूपाने शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व मिळणार असल्याचा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत खासदार लंके यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. "मतदारसंघात कोट्यवधींचा निधी येऊनही नागरिकांना अद्यापही पाण्यासाठी तहानलेले राहावे लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था असून जागोजागी खड्डे पडले आहेत. प्रत्येक कामात भ्रष्टाचार स्पष्टपणे दिसत आहे," असे त्यांनी नमूद केले.
उमेदवार अजित गव्हाणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करण्याचा निर्धार व्यक्त केला. "मेट्रो सिटी म्हणून नावाजलेल्या शहरात वीज, पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आणि दडपशाहीमुळे परिवर्तन अटळ झाले आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाचा उल्लेख करत खासदार लंके यांनी विधानसभा निवडणुकीतही परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. गव्हाणे यांच्या स्वच्छ चारित्र्य आणि दूरदृष्टीमुळे मतदारसंघाचा परिपूर्ण विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: