चिंचवडच्या सुनियोजित विकासासाठी कटिबद्ध - राहुल कलाटे
वाकड : दिवाळीच्या सणासुदीच्या वातावरणात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी मतदारसंघातील नागरिक, ज्येष्ठ नेते आणि जुने जाणते कार्यकर्ते यांची दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.
चिंचवड मतदारसंघात बाहेरून येऊन स्थायिक झालेले तसेच स्थानिक नागरिकांचे संमिश्र समाज आहे. पक्षात फूट पडल्यानंतर, अनेक जुने कार्यकर्ते आणि मतदार शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत, यामुळे कलाटे यांनी त्यांच्याशी संवाद साधून, एकजूट कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.
राहुल कलाटे यांनी गुरुवारी (ता. ३१) रहाटणी, पूनावळे, थेरगाव, वाकड, आणि चिंचवड येथील ग्रामदैवतांचे दर्शन घेत विविध गावांतील ग्रामस्थ आणि मतदारांशी हितगुज केले. या भेटीदरम्यान नागरिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले, सुहासिनींनी औक्षण केले आणि पेढे भरवून शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नाना नवले यांच्याशीही कलाटे यांनी भेट घेतली व त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी राहुल कलाटे यांनी चिंचवड मतदारसंघाच्या पुढील पन्नास वर्षांच्या सुनियोजित विकासाचे संकल्पना सादर केली. त्यांनी भूमीपुत्र म्हणून स्थानिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळवून देण्याच्या आणि विकास साधण्याच्या दृष्टीने काम करण्याची तयारी दर्शवली.
"चिंचवडच्या सुनियोजित विकासासाठी कटिबद्ध आहे. नगरसेवक म्हणून मी अनेक विकासकामे केली आहेत, आणि भविष्यकाळात भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी सखोल विकास साधण्याचे माझे उद्दिष्ट आहे."
- राहुल कलाटे
"शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व असलेले राहुल कलाटे हे चिंचवडचा विकास साधण्यासाठी समर्थ आहेत. त्यांच्या विजयाची अपेक्षा सर्वसामान्य मतदारांना आहे."
- ज्येष्ठ नेते मच्छिन्द्र तापकीर
Reviewed by ANN news network
on
१०/३१/२०२४ ०७:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: