चिंचवड (प्रतिनिधी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी रावेत प्रभागात भाजप आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी घोंगडी बैठका आणि कोपरा सभा आयोजित करून जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनीही या उपक्रमांना मोठा प्रतिसाद दिला आहे.
भारतीय जनता पक्षाने पहिल्याच यादीत शंकर जगताप यांचे नाव जाहीर करताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच रावेतमधील पहिला प्रचार टप्पा पूर्ण केला आहे. रावेतमधील नागरिकांनी महायुतीच्या उमेदवार शंकर जगताप यांना मत देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
रावेतमधील १८ मीटर डीपी रस्त्याचे काम शंकर जगताप यांच्या पाठपुराव्यामुळेच मार्गी लागले, याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले. या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला होता. यामुळे रावेतमधील सोसायटीधारक आणि नागरिकांनी भविष्यातही जगताप यांना रावेतच्या विकासासाठी पाठिंबा देण्याचे वचन दिले.
या घोंगडी बैठका आणि सभांचे नियोजन माजी नगरसेविका संगीता भोंडवे, रावेत-काळेवाडी मंडलअध्यक्ष सोमनाथ भोंडवे, माजी स्वीकृत सदस्य संदीप गाडे आणि अन्य कार्यकर्त्यांनी केले होते. यावेळी विविध सोसायट्यांचे सदस्य, सोसायटी चेअरमन, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: