मागण्या न मान्य झाल्यास जानेवारीत मंत्रालयासमोर आंदोलन
मुंबई : राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी दिवाळीपासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून पुकारलेले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे. ऑल महाराष्ट्र फेयर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन आणि अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
मार्जिन वाढीसह विविध मागण्यांसाठी दुकानदारांनी धान्य उचल व वितरण न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गुरुवारी (२४ ऑक्टोबर) मुंबईत झालेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आला.
प्रधान सचिवांनी सर्व जिल्हा प्रशासनाला ३१ ऑक्टोबरपूर्वी E-Pos मशिनवरील प्रलंबित मार्जिनची रक्कम दुकानदारांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मार्जिन वाढीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.
जानेवारी-फेब्रुवारी २०२५ पासून मार्जिनची रक्कम थेट दुकानदारांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास १ जानेवारी २०२५ पासून राज्यातील ५६ हजार दुकानदार मंत्रालयासमोर व आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने प्रधान सचिवांच्या विनंतीवरून आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असून, धान्याचे वितरण सुरळीत होऊन ते वेळेत शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहोचणार असल्याचे फेडरेशनचे कोषाध्यक्ष विजय गुप्ता यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: